सकाळि तीन ला घर सोडल्यावर म्हणजे डेक्कन वरून 2-3 तासात दिवेघाटात पोहचता येत कारण 6 नंतर रस्ता बंदच झालेला असतो जवळपास. त्यामुळे एवढ्या पहाटेची लगबग. त्या वारितला माउली पहायला.
हो माऊली. वारित लहान- मोठा, स्त्री-पुरुष असा भेद नसतो तिथे सगळे माऊलीच.
' मा ' माय ,
'ऊ ' उदार ,
'ली' लीन.
5 वर्षाच्या लहान मुलापासून ते 90 वर्षाच्या आजोबा पर्यंत. किती चेहरे आणि त्यांच्या कथा. पण कोणाच्याच चेहर्यावर थकवा नाही की त्रासीक भाव नाही. वेगळच समाधान आणि अपूर्वाईची चमक घेउन हा वैष्णवाचा मेळा चाललेला असतो.
त्या दिवशीच दिवेघाटाचा रंगच वेगळा असतो.एरवी रुक्ष वाटणारा तो मार्ग केशरी आणि पांढर्या रंगाने खुलून गेलेला असतो.
यात मजा येते गावकडच्या भोळ्या भाबडया आजींचे फोटो काढताना. यांना फोटो काढून घेण्यात प्रचंड आवड असते. अगदी लहान मुला प्रमाणे फोटो काढला की तो पहाण्याचा हट्ट करणार आणि आवडला तर गोड हसणार किंवा मग, ' पदर नाय डोक्यावर, पुन्यांदा पुन्यांदा ' अस नाराजिच्या पण हक्काच्या सुरात सांगणार.
टाळ आणि मृदंगाच्या ठेक्यात नाचणारे 60-70 वर्षाचे तरुण पाहिले की आलेला थकवा कुठल्या कुठे निघून जातो. मजा येते त्यांची टाळ वाजवत वाजवत नाचताना सुरु होणारी स्पर्धा पाहून.
त्यांच्या चेहर्याचे भाव आणि एकमेकांना नाचत दिलेला आव्हान जेव्हा अभंग संपतो तेव्हा एक मेकाच्या पाया पडून संपलेला असत कारण वारित एक पद्धत आहे. इथे लहान मोठा कोणी नाही ना इथे मत्सराला जागा आहे.